मनोगत

आठवले साहेब समजून घेण्यापूर्वी…

… डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची समाज रचना समजून घेणं गरजेचं आहे….

भारतामध्ये दोन विचारसरणींचा कायमस्वरूपी संघर्ष हजारो वर्षांपासून दिसून येतोय एक ब्राम्हणी तत्वज्ञान आणि दुसरं बुद्धाचं तत्वज्ञान. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याची नीट मांडणी त्यांच्या लिखित पुस्तकात केली आहे आणि त्यांच्या अनेक भाषणांत केली आहे. ब्राम्हणी धर्माच्या तत्वज्ञानामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशी मांडणी उतरंडीनुसार हायरारकी नुसार आहे आणि हीच उतरंड ब्राम्हणी तत्वज्ञानास कायम ठेवायची होती, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. बुद्ध तत्वज्ञान आणि ब्राम्हणी तत्वज्ञान या मधील संघर्ष हा या व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष आहे. यामध्ये आधुनिक काळात कोणती मूल्ये स्वीकारणार हा प्रश्न बाबासाहेबांनी सातत्याने विचारलेला आपण पाहतो. त्यासाठी बाबासाहेब स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि लोकशाही ही मूल्ये समाजाला देशाला देण्याचा प्रयत्न करतात. 

एक नंबरला ब्राम्हण, दोन नंबरला क्षत्रिय, तीन नंबरला वैश्य आणि चार नंबरला शूद्र, अतिशूद्र (अति शूद्र मध्ये ५०% लोकसंख्या असलेल्या सगळ्या स्त्रिया येतात.) अगदी ब्राम्हणांच्या स्त्रियापण अतिशूद्र आहेत, क्षत्रियांच्या स्त्रिया सुद्धा अतिशूद्र आहे आणि वैश्यांच्या स्त्रिया सुद्धा अतिशूद्र आहेत. शुद्रांच्या स्त्रिया आणि अतिशूद्र स्त्रिया सुद्धा शूद्रच आहेत, हे ब्राम्हणी तत्वज्ञान बाबासाहेबांना मान्य नव्हतं! चार वर्ण आणि साडे सहा हजार जाती बाबासाहेबांना मान्य नव्हत्या. त्यांना याला पर्याय म्हणून बुद्ध तत्वज्ञान भारतात रुजवायचं होतं. ज्यामध्ये कुणीही एक नंबर नाही, कुणीही दोन नंबर नाही, कुणीही तीन नंबर नाही आणि कुणीही चार नंबर नाही. सर्वांना संधीची समानता बाबासाहेबांना अपेक्षित आहे. व्यक्ती जन्माला आल्यावर त्याला त्याच्या संपूर्ण क्षमतांचा विकास करण्यासाठी कुटुंब, शाळा, विद्यापीठ आणि भोवतालचा समाज याने वातावरण तयार करून द्यायला हवे असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावरची लढाई, संसदेची लढाई, सांस्कृतिक लढाई, शैक्षणिक लढाई, राजकीय लढाई, सामाजिक लढाई, धार्मिक लढाई!….

सगळ्या प्रकारच्या लढाया लढल्या आणि शेवटी भारतीय संविधानामध्ये त्या सगळ्या लढायांचं सार भारतीय माणसाच्या प्रगतीचं सार लिहून ठेवलं. त्यातूनच भारत देशाला समाजाला मार्गदर्शन केलं. पण तरीही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय समाज रचना संविधानात सांगितलेल्या मूल्य व्यवस्थेनुसार प्रगतीचा वेग घेत नसल्याचे निरिक्षण तुम्ही आम्ही करीत आहोत.

हजारो वर्षांपासून इतिहासात आम्ही ज्या घटना ऐकल्या वाचल्या त्यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या उतरंडीनुसार शुद्रांना भारतामध्ये वाईट ट्रीट केलं गेलं. या वाईटामध्ये शुद्रांना सत्ता मिळू दिली गेली नाही. शुद्रांना ज्ञान मिळू दिलं गेलं नाही, शुद्रांना संपत्ती मिळू दिली गेली नाही, शुद्रांना प्रतिष्ठा मिळू दिली गेली नाही. अन्न- वस्त्र-निवारा – शिक्षण- आरोग्य- रस्ते-पाणी हे त्यांना नागरिक म्हणून मिळू नये म्हणून सतत काळजी घेतली गेली. शुद्रांना त्रास देणं हा धर्माचा भाग समजला गेला, शुद्रांना त्रास देणं हे धर्मकर्तव्य समजलं गेलं, शुद्रांना त्रास देणं हाच धर्म समजला गेला आहे! त्यांची जगण्याची परवड होईल इथपर्यंत शुद्रांशी वाईट वागलं गेलंय. आजही त्यांनी हागावं आणि शुद्रांनी ती घाण, तो मैला डोक्यावरून वाहावा, ती घाण शुद्रांनी डोक्यावरून वाहून न्यावी असं उच्च वर्णीयांना वाटतंय. उत्तर भारताच्या काही राज्यांमध्ये अजूनही या प्रथा चालू आहेत. पाळीव प्राणी (गाय, बैल, म्हशी, रेडे ) त्यांनी पाळावे, ते प्राणी जिवंत असेपर्यंत त्याचे सगळे फायदे त्यांनी घ्यावे आणि ते प्राणी मेल्यावर त्या मृत प्राण्यांना उचलून नेण्यासाठी, त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शुद्रांना जबरदस्ती केली जाते. संपत्ती फक्त उच्च वर्णीयांनी गोळा करावी आणि शुद्रांनी संपत्ती गोळा केली तर ती नासधूस करण्याचा, लुटून नेण्याचा अधिकार हिंदू धर्म ग्रंथांनी उच्च वर्णियांना दिला आहे. इतर शूद्रांसाठी केलेल्या गुन्हयांमध्ये नियमांमध्ये…

१) स्त्रियांनी त्यांची शूद्र म्हणून ओळख व्हावी यासाठी त्यांनी त्यांचा छातीचा भाग, स्तन झाकू नये यासाठी नियम केले गेले होते.

२) शूद्र पुरुषांनी पूर्ण वस्त्र घालू नये, नवीन कपडे घालू नये यासाठी नियम केले गेले होते.

३) शुद्रांना पुरेसं अन्न मिळू नये, ते सतत अवलंबून रहावे यासाठी नियम केले गेले होते.

४) शुद्रांनी झोपड्यांमध्ये, खुरटयांमध्ये रहावं असे नियम केले गेले होते. ५) शुद्रांनी आपल्या मुलांची नावं चांगली रुबाबदार ठेवू नये यासाठी नियम केले गेले होते.

७) शुद्रांनी लग्न केल्यावर त्यांच्या बायका वापरता याव्या यासाठी नियम केले

गेले होते.

८) शुद्रांनी लग्नामध्ये घोड्यांचा / डोलीचा वापर करू नये म्हणून नियम केले गेले होते.

९) शुद्रांनी लग्नामध्ये लाडू जेवण अथवा बडेजाव करू नये यासाठी नियम केले गेले होते.

१० ) शुद्रांनी खुर्चीत बसू नये यासाठी नियम केले गेले होते.

११) शुद्रांनी चपला घालू नये यासाठी नियम केले गेले होते.

१२) शुद्रांना रस्ते वापरायला मिळू नये यासाठी नियम केले गेले होते. १३) शुद्रांनी कौलारु घर बांधू नये यासाठी नियम केले गेले होते. १४) शुद्रांनी गोधन बाळगू नये यासाठी नियम केले गेले होते. १५) शुद्रांनी सोन्याचे दागिने घालू नये यासाठी नियम केले गेले होते. १६) शुद्रांनी मिरवणूक काढू नये म्हणून नियम केले गेले होते. १७) शुद्रांना पाणी मिळू नये म्हणून नियम केले गेले होते.

१८) शुद्रांनी शुद्ध भाषा बोलू नये, संस्कृत भाषा शिकू नये म्हणून नियम केले गेले होते.

१९) काही प्रसंगी शुद्रांनी आपल्या बायका गावकऱ्यांना असभ्य छेडखानीसाठी उपलब्ध करून द्यायलाच पाहिजे असे दंडक आणि नियम केले गेले होते. २०) इतिहास काळात शुद्रांच्या कानामध्ये ब्राम्हणी मंत्र ऐकल्यास शिशाचं गरम तेल ओतणे असे नियम होते.

२१) शंबुकासारख्यानं ज्ञान मिळविल्यास त्यांचं मुंडकं उडविणे असे नियम होते.

२२) एकलव्यासारख्यानं कौशल्य प्राप्त केल्यास त्याचा अंगठा कापणे असे नियम होते.

२३) शुद्रांच्या पावलांचे ठसे उमटू नये म्हणून कंबरेला खराटा (झाडू) बांधणे असे नियम होते.

२४) शुद्रांची मुंडकी छाटून पेशवेकाळात फुटबॉल खेळणे इत्यादी क्रूर बाबी शुद्रांच्या बाबतीत केल्या गेल्या आहेत.

या सगळ्या अन्याय अत्याचाराची चर्चा बाबासाहेबांनी त्यांच्या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये केलेली आहे. नानकचंद रत्तू या त्यांच्या खाजगी सचिवाच्या पुस्तकांमध्ये देखील बाबासाहेबांची ऐतिहासिक लेखणी वाचायला मिळते.

असे अनेक नियम संकेत शुद्रांना पूर्वीपासून आजही लागू आहेत आणि हे संकेत नियम मोडल्यास तो धर्माचा अपमान आहे हे कारण देवून उच्चवर्णीय लोक शुद्रांवर हल्ला करतात, त्यांना बेदम मारतात, ठार मारतात, त्यांच्या संपत्तीची नासधूस करतात, संपत्ती लुटून नेतात. आज भारतात जो अॅट्रॉसिटीचा कायदा आला आहे. तो याच नागरिक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आहे आणि तरीही सर्रास पूर्ण भारतभर शूद्रांवर याच नियमांचं पालन न केल्यास हमले, हल्ले होत असतात, त्यांना त्यांच्या सामान्य नागरिक हक्कांपासून वंचित केलं जातं. प्रसंगी त्यांना विष्ठा भरवली जाते, त्यांच्या आया-बहिणींवर बलात्कार केले जातात, त्यांना उभं जाळलं जातं, त्यांना धारदार शस्त्रांनी भोसकलं जातं, त्यांचे हातपाय तोडले जातात, त्यांना हर परीने नागवण्यात येतं. त्यांची नग्न धिंड काढण्यात येते, त्यांच्या झोपडया-वस्त्याच्या वस्त्या जाळण्यात येतात आणि बेचिराख केल्या जातात, त्यांच्या विहिरींमध्ये विष्ठा टाकली जाते. त्यांचा दाणा-पाणी बंद केला जातो, त्यांना गावातून हुसकावून लावण्यात येतं, त्यांच्या सगळ्या बाजूने मुसक्या बांधल्या जातात, त्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं जातं. त्यांना कुठेही न्याय मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले हे नाव या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड करून अन्याय अत्याचाराला जशास तसं उत्तर देणारं नाव आहे. 

विरोधकांच्या मनात धडकी भरवणारं हे नाव आहे. विरोधकांना सळो की पळो करून सोडणारं हे नाव आहे. त्यांची दलित पँथर आणि त्यानंतर भारतीय दलित पँथरची चळवळ याच आधारावर उभी राहिलेली आणि लोकांचा भरघोस पाठिंबा मिळालेली चळवळ आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार झालेली ही चळवळ आहे. या चळवळी पासून गेली ४५ वर्षे रामदास आठवले तसूभरही बाजूला झालेले नाहीत. आजही अन्याय, अत्याचार झाल्यावर सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचणारा एकमेव नेता म्हणजे रामदास आठवले हेच आहेत. शुद्रांच्या सगळ्या जगण्यावर ब्राम्हणी तत्वज्ञानाने कब्जा केलेला आपण इतिहासात वर्तमानकाळात बघू शकतो. या विकृत ब्राम्हणी तत्वज्ञानाला फाट्यावर मारून शुद्रांचे नागरिक अधिकार त्यांना मिळवून देण्याची चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ. याच चळवळीला पुढे नेण्याची जबाबदारी आठवले साहेबांनी आपल्या अंगावर घेतलेली दिसते.

आठवले साहेबांची भारतीय सामाजिक, राजकीय जीवनात एंट्री १९७२ ते १९७८ ला झाली… आणि तेव्हापासून आज २०२३ पर्यंत जवळ जवळ ४५ वर्षे आठवले साहेब आपल्या संपूर्ण मानसिक, शारीरिक, भावनिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय ताकदीनीशी समाजामध्ये या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सजग राहून सक्रिय राहून, जोमात काम करीत आहेत. त्यांच्या सगळ्या क्षमता, त्यांची सगळी समज, त्यांचे संपूर्ण आकलन त्यांनी या कामासाठी लावलेले दिसते आणि अगदी झोकून देवून ते आपले काम करत असताना आम्ही त्यांच्या सहवासातले कार्यकर्ते पाहत आहोत.

बाबासाहेबांनी नेमून दिलेल्या मुल्य व्यवस्थांना बळकटी देण्यासाठी आठवलेसाहेब लोकशाहीची भाषा बोलतात. कधीही ठोकशाहीचे त्यांनी समर्थन केलेले नाही. स्वातंत्र्य हया मुल्यासाठी ते आग्रही आहेत. समता हया मुल्यासाठी ते आग्रही आहेत. बंधुता हया मुल्यासाठी ते आग्रही आहेत. सामाजिक न्याय हया मुल्यासाठी ते आग्रही आहेत.

बाबासाहेबांनी सत्तेत राहण्याचा जो मंत्र दिला, त्यासाठी आठवले साहेब सत्तेत राहून आपल्या माणसांना बळ देण्याचं काम करीत आहेत.

सत्ता संपत्ती-ज्ञान प्रतिष्ठा यांच्यापासून हजारो वर्षे ब्राम्हण धर्माने शूद्र आणि अति शुद्रांना दूर ठेवले. आठवले साहेब या विरोधात जावून बुद्ध तत्वज्ञानाच्या आग्रहानुसार सत्ता संपत्ती-ज्ञान प्रतिष्ठा आपल्या माणसाला कशी मिळेल याकडे सातत्याने लक्ष देतात.

आमचे प्रिय नेते मा. ना. डॉ. रामदासजी आठवले साहेबांचा आठवणींचा हा ग्रंथ वाचकांस सादर करताना आम्हा दोघांना प्रचंड आनंद होत आहे, हे सुरुवातीलाच कबूल करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्या चळवळीला ‘आंबेडकरी ‘चळवळ’ असे नाव पडले, त्या चळवळीच्या अनेक नेत्यांपैकी ‘दादा’, दमदार, वजनदार, शानदार, कर्तबगार नाव म्हणजे ‘रामदास आठवले’ हे नाव आहे. बऱ्याच लेखकांनी आंबेडकरी चळवळीच्या दिग्गज नेत्यांना पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या नेत्यांपैकी रामदास आठवले या नावाला डॉक्यूमेंट करण्याचा हा आमचा पहिला प्रयत्न आहे. आंबेडकरी चळवळीच्या योगदानामध्ये ज्यांनी ज्यांनी श्रम परिश्रम केले आहेत, खस्ता खाल्ल्या आहेत, आपल्या लहान आयुष्यात मोठी भरारी मारली आहे, कुटुंब बाजूला ठेवून समाजाप्रती आपली निष्ठा दाखवली आहे, जास्तीत जास्त समाजाला वेळ दिला आहे, त्रासामध्ये असलेल्या लोकांची जास्तीत जास्त गाऱ्हाणी ऐकली आहेत. आपल्या दिवसाचा आठवडयाचा महिन्यांचा वर्षांचा जास्तीत जास्त वेळ समाजकारण- राजकारण-धर्मकारण-सांस्कृतिक-शैक्षणिक यासाठी दिला आहे, अशा महान नेत्यांपैकी एक ‘रामदास आठवले’ हे नाव आहे. अन्न- वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य- रस्ता-पाणी-वीज अशा मुलभूत गोष्टींची गाऱ्हाणी घेवून लोक आठवले साहेबांकडे येतात आणि आठवले साहेब या सगळ्यांना आपल्या क्षमतेनुसार, आकलनानुसार, आपल्या सत्तेतील स्थानानुसार आपल्या समाजातील प्रतिष्ठेनुसार न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा हा प्रयत्न १०० टक्के असतो, हे आम्ही सतत दर दिवशी डोळ्याने बघतो. त्यांचं दिवसाचं शेड्युल पाहिले तर यामध्ये याच सामान्य माणसाच्या सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकतो ते ते साहेब करत असताना आम्ही पाहतो. सन २०२३ मध्ये हे आम्ही पाहतोय पण सन १९७२ ते १९७८ पासूनच्या कहाण्या सांगणारे लोक जेव्हा आम्ही बोलते केले, तेव्हापासून आठवले साहेब हेच करत आहेत असं सांगणारे लोक आम्हाला भेटले.

मूळात आंबेडकरी समूह हा सुरुवातीपासून अभावग्रस्त आहे. अन्नाची अभावग्रस्तता, वस्त्राची अभावग्रस्तता, निवाऱ्याची अभावग्रस्तता, शिक्षणाची अभावग्रस्तता, आरोग्याची अभावग्रस्तता, रस्त्यांची अभावग्रस्तता, पाण्याची अभावग्रस्तता, विजेची अभावग्रस्तता अशाप्रकारे संपूर्ण आयुष्य हे अभावग्रस्त, अशी एक एक माणूस म्हणून समाजाची अवस्था आहे. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्त्वाने आज ही अभावग्रस्तता दूर होताना दिसते. आजही हा अभावग्रस्त समाज सगळ्याच बेसिक गरजांपासून वंचित आहे, वल्नरेबल आहे. अशा समाजाचं नेतृत्व करणं, त्यांच्यासाठी मी पाय रोवून इथे उभा आहे हे दाखवणं, प्रसंगी घर वस्ती-नगर- गाव तालुका-जिल्हा-राज्य देश पिंजून काढून मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे हे छातीठोकपणे सांगणं आणि खरोखरच तसं लोकांना दिवसरात्र उपलब्ध होणं ही मोठी गोष्ट आठवले साहेब समाजासाठी करत असतात. तुलनेने इतर जातीसमूहांचे नेते जर बारकाईने पाहिले तर एवढा वेळ जनतेला देताना दिसत नाहीत.

सकाळी दहा-अकरा पासून रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत जनतेला सतत उपलब्ध होणं ही अचंबित करणारी गोष्ट आहे. एक हाती एक राष्ट्रीय पक्ष चालविणं, त्यात सातत्य ठेवणं, गावागावात पक्षाची शाखा ते नेपाळ दुबईपर्यंत रिपाई शाखा काढावीशी वाटणं, एवढं प्रचंड प्रेम आणि समाजाची गरज आठवलेसाहेब बनले आहेत. गावापासून- सरकारी नोकरशाही- सामाजिक कार्यकर्ते पासून राजकीय कार्यकर्ते शैक्षणिक कार्यकर्ते-धार्मिक कार्यकर्ते – सांस्कृतिक कार्यकर्ते सगळ्यांना आठवले साहेब अडचणीमध्ये, अत्याचारामध्ये एकमेव आधार वाटतात. त्रास झाला, अन्याय झाला, अत्याचार झाला की, हक्काचा एकच नेता आठवतो, तो म्हणजे रामदास आठवले! काही कामं अडली, काही कामं करायची आहेत, तर गरजवंत लोकांची पावलं, साहेब असतील तिथे मुंबईला, दिल्लीला वळतात. या सगळ्यांचा साहेब आधारवड झाले आहेत हे कुणीही मान्य करेल! अशा या आंबेडकरी चळवळीत आधारवड झालेल्या आठवले साहेबांचं ‘सहवासातले आठवले’ हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. पुस्तकाचा हा पहिला भाग आम्ही जाणीवपूर्वक खंड पहिला असा उल्लेख करून लिहिला आहे. 

आठवले साहेब हे एका ग्रंथात मावणारे नेते नाहीत असं आमचं सांगणं आहे. या ग्रंथाचे खंड दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा असे अनेक खंड भविष्यात होतील याची आम्हाला खात्री आहे. कारण साहेबांबद्दल बऱ्याच आठवणी अजून लोकांना सांगायच्या आहेत आणि साहेबांचा सार्वजनिक जीवनाचा कालावधी पाहता असे अनेक लोक अजून आठवणी सांगण्यासाठी प्रलंबित आहेत. त्या सगळ्यांच्या आठवणी पुस्तक रूपाने भविष्यात प्रकाशित व्हाव्यात, असं आम्हाला मनापासून वाटतंय. त्यामुळेच खंड-एक म्हणून आम्ही नामाभिदान या आठवर्णीच्या ग्रंथाला केलं आहे. येत्या काही वर्षांमध्ये या सहवासातले आठवले’ ग्रंथाचे अनेक खंड येवोत अशा आशावादाने आम्ही प्रेरित आहोत.

या पुस्तकाला अनेकांचे आशीर्वाद लाभले आहेत. अनेकांचे विविध प्रकारचे योगदान लाभले आहे. या योगदानामध्ये महेश लंकेश्वर, वैशाली मोरे, नवनाथ निकम, संतोष मोरे, परशुराम महागांवकर यांची नावं सुरुवातीला घ्यावी लागतील.

या पुस्तकाला सहकार्य करणाऱ्या मा. अनिल गायकवाड यांचे आम्ही विशेष आभार मानतो. यासोबत डॉ. हुजैफा खोराकीवाला (व्होकार्ड फाऊंडेशन) यांचे देखील आम्ही विशेष आभार मानतो. आदरणीय सिमाताई आठवले यांनीही वेळोवेळी सहकार्य केले. माननिय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आशिर्वादानेच हे पुस्तक आकार घेत आहे. रूपाली जाधव यांनी संपूर्ण पुस्तकाच्या प्रूफरिडींगसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार. संगिता जावळकर यांनी अक्षर जुळणीची जबाबदारी चोख पार पाडली. त्याबद्दल त्यांचे आभार. यासोबत शिरिष रामटेके यांचे आणि सतीश निकाळजे यांचे विशेष सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार मानतो. 

– प्रविण मोरे, चंद्रमणी जाधव